पंढरपूर – राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरात वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. सण-उत्सव आणि यात्रेच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. त्यासाठी शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा देखील कार्यरत आहे. मात्र तरी देखील शहरातील अनेक भागात कायमच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने शहरवासियां मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेच्या कार्यालयासमोरच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंढरपूर शहरातील उपविभागीय पोलिस कार्यालय,भादुले चौक, चौफाळा , अर्बंन बँक मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई पटांगण, अहिल्यादेवी चौक, संतपेठ, महात्मा फुले पुतळा, भक्तीमार्ग या ठिकाणी कायम वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. शहरातील वाहतूक पोलिसांच्या समोरच अवजड वाहतूक देखील शहरातील अनेक प्रमुख मार्गावरुन सर्रास सुरु असते. मात्र वाहतूक पोलिसांकडून त्याला जरब बसण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. येत्या काळात साखर कारखाने देखील सुरु होत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक देखील सर्रास शहरातूनच होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे अगोदरच वाहतूक कोंडीची समस्या त्या मध्ये उस वाहतूक म्हणजेच दुष्काळात तेरावा अशीच परिस्थिती या पुढे देखील शहरात वाहतूकीची होईल अशी खात्री शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
———————–
चौकट : ( आमदारांनी विधानसभेत आवाज उठवूनही समस्या कायम )
पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न यापूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून वाहतुकीला शिस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
———————-
चौकट : ( वाहतूक शाखा नेमकी करते तरी काय?)
पंढरपूर शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. या शाखेचा कारभार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. मात्र, शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमके कुठे असतात ? असा देखील सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
———————
चौकट : ( पोलिस कार्यालया समोरच वाहतूक कोंडी )
विशेष म्हणजे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या कार्यालयासमोरच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांमध्ये अधिक संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील वाहतूक कोंडीची समस्या जर प्रशासनाच्या निदर्शनास येत नसेल, तर शहरातील इतर भागांतील वाहतूक व्यवस्थेचे काय, असा सवाल केला जात आहे.
———————
चौकट : ( कॉरिडॉरपूर्वी सध्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज)
पंढरपूर शहरातील वाहतूक समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
———————
चौकट : ( शहरवासियांबरोबरच भाविकांनाही मनस्ताप )
पंढरपूर हे केवळ शहर नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणात भाविक शहरात दाखल होत असतात. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह भाविकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
———————
चौकट : ( केवळ कागदोपत्री नियोजन नको, प्रत्यक्ष कृती आवश्यक ) पंढरपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांची आवश्यकता असली, तरी त्यासोबत शहरातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था सक्षम करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी शहरवासियांमधून आता जोर धरत आहे.
Post Views: 17