बार्शी – दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या लहान मंदिराजवळ घडली. सुनिल पांडुरंग जाधव (वय ३०, रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अनिल मधुकर ढेरे (वय ३६, रा. उपळाई ठोंगे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), ३२४(४), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ढेरे हा होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) वरुन स्वतः तसेच पाठीमागे सुनिल जाधव यांना बसवून खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात होता. लक्ष्मीआई मंदिराजवळ पोहोचले असता रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकीस्वाराने ब्रेक लावून मोटारसायकल थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोटारसायकल घसरुन दोघेही रस्त्यावर पडले.
या अपघातात सुनिल जाधव यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना १० सप्टेंबर रोजी दुपारीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात मोटारसायकलचे अंदाजे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने पुढील तपास दत्तात्रय पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
Post Views: 26