बार्शी – बार्शी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन खरीप हंगाम २०२६ मधील पिकांच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
आमदार राऊत यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले की, जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, तूर, मका, कांदा, भुईमूग, मूग आदी पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घकाळ खंड दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी बार्शी तालुक्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, अशी मागणी आमदार राऊत यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली.
यावेळी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी बार्शी तालुक्यातील परिस्थितीची गंभीर दखल घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
Post Views: 14