सोलापूर : अज्ञात कारणावरून एका २२ वर्षीय तृतीयपंथीय तरुणाने लोखंडी अँगल ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना होटगी रोड परिसरातील साखर कारखाना स्मशानभूमीत शनिवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली.
अभिजीत उर्फ कोमल हरिबा नागटिळक (वय २२ वर्ष , रा. साईनाथ नगर, साखर कारखान्याजवळ, होडगी रोड, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तृतीयपंथीय तरुणाचे नाव आहे.
कोमलने साखर कारखाना परिसरातील स्मशानभूमीतील गळफास घेतला असल्याचे रात्री आठ वाजता स्थानिक लोकांना आढळून आले . त्यांनी तात्काळ विजापूर नाका पोलिसांना माहिती दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल एन. सी. सागळे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोमल यांना खाली उतरवून तातडीने उपचारासाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोमल यांच्या मृत्यूची बातमी समजताच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायाने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात प्रचंड गर्दी केली. या आत्महत्येमागे प्रेमसंबंधातून झालेला छळ कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काही काळ तणाव निर्माण झाला होता. शुभमला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे अश्वासान दिले.
चौकट –
कोमलने आत्महत्येपूर्वी प्रियकराला केला होता व्हिडिओ कॉल – कोमलचे गुरु रोहिणी मोरे
अभिजीत उर्फ कोमलचे शुभम नावाच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शुभम हा कोमल यांना वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कोमलने हे टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी कोमल यांनी शुभमला व्हिडिओ कॉल केला होता. या छळासंबंधीचे चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंगचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही कोमलचे गुरु रोहिणी मोरे यांनी यावेळी केला.दरम्यान, नरसिंग बिल्ला यांनी आरोपीवर कडक कारवाई करावी याबाबतचे लेखी निवेदन पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांना दिले आहे.
Post Views: 15