सोलापूर –“तुम्ही हालचाल करू नका, एका ठिकाणी उभा रहा, तुमच्या सर्वांकडे असलेले पैसे काढून द्या, नाहीतर मी तुम्हाला गोळी मारून खल्लास करेल,” अशी जीवे मारण्याची धमकी देत तीन अज्ञात सशस्त्र गुंडांनी महाविद्यालयीन तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले आहे. ही घटना पुणे सोलापूर रोडवरील एमआयटी कॉलेजजवळील सर्व्हिस रोडवर घडली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तीवर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत आयान मोहसीन डोणगावकर (वय २०, रा. मुस्लीम पाच्छा पेठ,सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी व त्याचा मित्र जीवनकुमार तोळनुरे हे फुटबॉलची प्रॅक्टिस करण्यासाठी कारने (एमएच १३ एझेड ६२०६) सिंहगड महाविद्यायल केगाव येथे गेले होते. फुटबॉलची प्रॅक्टीस करून घराकडे निघाले होते. आयान आणि त्याचे मित्र कारमधून जाता असताना त्याचे इतर तीन मित्र भेटले. म्हणून पुणे सोलापूर रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ कार थांबवून आपापसात संवाद साधत उभे होते. त्याच वेळी एका विनानंबरच्या दुचाकीवरून तीन अनोळखी इसम भरधाव वेगाने तेथे आले. त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता आपली दुचाकी फिर्यादीच्या कारसमोर अचानक आडवी लावली. दुचाकीवरून खाली उतरताच एकाने थेट आयानच्या कपाळाला पिस्तूल लावले आणि इतर मित्रांनाही गोळ्या घालण्याची धमकी दिली. अचानक उद्भवलेल्या या प्राणघातक प्रसंगाने सर्व तरुण प्रचंड हादरले. स्वसंरक्षणासाठी आणि जीव वाचवण्यासाठी तरुणांनी “आमच्याकडे सध्या रोख पैसे नाहीत, आम्ही तुम्हाला हवे असल्यास ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो अशी तरुणांनी विनंती केली. मात्र, आरोपींनी ऑनलाईन व्यवहार नाकारत रोख रकमेचाच हट्ट धरला. त्यानंतर दुचाकीवरील इतर दोन साथीदारांनी तरुणांची झडती घेत मोहम्मद अनस खलीफा याच्या खिशातील ३,५०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली अन् दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणांनी तातडीने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून त्या परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याचे काम सुरु आहे. तसेच फिर्यादीवरून आरोपीचे वर्णन सांगितले आहे त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.
Post Views: 14