सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचे आव्हान निर्माण झाले असतानाच, दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा या सामाजिक बांधिलकीतून एम. के. फाउंडेशनच्या वतीने बहुरूपी नगर, विजापूर रोड येथे गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे.
एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बहुरूपी नगरमधील मल्लेश सूर्यवंशी, बसवराज सितारे, सुभाष सितारे, कल्लाप्पा तेले यांच्यासह परिसरातील नागरिक व फाउंडेशन परिवाराचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या उद्देशाने शिधा किट तयार करण्यात आले होते. गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवताना त्यांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विचार करण्यात आल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे. केवळ सणाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्याच्या घरातही आनंदाचा दिवा पेटवण्यात आहे.





















