सोलापूर : शहरातील ऐतिहासिक नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयाला सुरेश केतकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या निर्णयाला संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला असून, या नामकरणाचा पुनर्विचार करून विद्यालयाला सोलापूरचे सुपुत्र अप्पासाहेब वारद यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या मंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी ईमेलद्वारे निवेदनाद्वारे केली आहे.
नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयाला सोलापूरच्या शैक्षणिक आणि ऐतिहासिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. अनेक पिढ्यांनी या विद्यालयातून तांत्रिक शिक्षण घेऊन आपले भविष्य घडविले आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक संस्थेचे नामकरण करताना सोलापूरच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक विकासात योगदान देणाऱ्या स्थानिक व्यक्तिमत्त्वांचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे.
सुरेश केतकर यांचे सोलापूर शहराच्या विकासासाठी नेमके कोणते योगदान आहे, याचा शासनाने जाहीर खुलासा करावा. या नामकरणाचा प्रस्ताव कोणी मांडला, कोणत्या स्तरावर निर्णय घेण्यात आला आणि त्याला कोणाची मंजुरी मिळाली, याचीही सविस्तर माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
सोलापूरच्या भूमीत अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी समाजासाठी आणि शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे स्थानिक अस्मिता, ऐतिहासिक वारसा आणि जनभावना लक्षात घेऊन नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयाला अप्पासाहेब वारद यांचे नाव देण्यात यावे. तसेच सध्याच्या नामकरण निर्णयाला स्थगिती देऊन त्याचा फेरविचार करावा, अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे.
सोलापूरच्या ऐतिहासिक संस्थांच्या नामकरणाबाबत स्थानिक जनभावनांचा अनादर सहन केला जाणार नाही. शासनाने मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिला आहे.