सोलापूर : न्यू बुधवार पेठेतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेला तातडीने प्लॅन व अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी भीमसैनिकांच्या मागणीनुसार माता रमाई यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेला सोलापूर शहरातील माता रमाई यांचा पहिला पुतळा नुकताच सोलापुरात दाखल झाला आहे. त्यामुळे उद्यान परिसरातील प्रलंबित सुशोभीकरणाचे कामही पूर्ण करण्याची मागणी चंदनशिवे यांनी केली आहे.
यासंदर्भात चंदनशिवे यांनी पालकमंत्री गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका शाखेकडून महापालिका आयुक्त आणि नगर अभियंता विभागाला पत्र पाठवून उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक प्लॅन व अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या पत्रानंतरही महापालिका प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप चंदनशिवे यांनी केला आहे. आयुक्त व नगर अभियंता विभागाने विलंब न करता प्लॅन व अंदाजपत्रक तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
—-
Post Views: 9