सोलापूर – ऊस दरातील स्पर्धा आणि उसाच्या पळवापळवीमुळे गेल्या दोन हंगामात गाळप कमी झाले. त्यामुळे साखर उद्योग अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला. इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस उत्पादकांना आजपर्यंत आपण 100 रुपये अधिकच दर दिला आहे. गत हंगामात गाळपास आलेल्या 70 टक्के शेतकर्यांची बिले अदा करण्यात आली असून, उर्वरित 30 टक्के ऊस उत्पादकांची तसेच वाहतूकदारांची थकीत बिले दिवाळीपूर्वी देण्यात येतील, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी दिली.
सोमवारी, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावरील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे झाली. त्यावेळी काडादी बोलत होते. प्रारंभी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनी अहवाल काळात दिवंगत झालेल्यांना श्रध्दांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी विषयपत्रिकेवरील विषय सभेसमोर मांडले. त्याला सभासदांनी एकमताने मान्यता दिली.
यावेळी काडादी म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्यानंतर गेल्या 28 वर्षांपासून आपण कारखान्यासाठी वेळ देत आहे. आपल्या कारखान्याने इतर कारखान्यांपेक्षा नेहमीच शंभर रूपये अधिक दर दिला आहे. कधीही बिले देण्यास उशीर झालेला नाही. गेली पाच-सहा वर्षे सातत्याने एफआरपीची रक्कम एकरकमी आणि स्पर्धेमुळे जो काही भाव जाहीर होईल तो द्यावा, अशी मागणी झाली. त्यानुसार बिले देण्यात आली आहेत. परंतु, साखरेच्या किमती कमी आणि स्पर्धेमुळे उसाचे भाव जास्त द्यावे लागत असल्याने सातत्याने आपल्याला शेवटची बिले देताना अडचणी येत आहेत. कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात सध्याच्या परिस्थितीइतका अडचणीचा काळ यापूर्वी आला नव्हता. सभासद आणि ऊस वाहतूकदारांची बिले थकल्याने त्यांना येणार्या अडचणींची संचालक मंडळाला कल्पना आहे. त्यामुळेच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून विविध माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारी साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि निधी उपलब्ध होण्यास लागणारा कालावधी यामुळे सभासदांची काही रक्कम थकीत राहिली असल्याचे काडादी यांनी सांगितले.
काडादी पुढे म्हणाले, गत हंगामात कारखान्याने 5 लाख 65 हजार टन उसाचे गाळप केले. साखरेची सरासरी रिकव्हरी 10.94 टक्के राहिली असून, 6 लाख 20 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामात एफआरपी 2 हजार 363 रुपये 32 पैसे असताना कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन 3001 रुपयांप्रमाणे दर दिला. गेल्या तीन वर्षांपासून एफआरपीपेक्षा आपण प्रतिटन जादा दर दिला आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून सुमारे 6 कोटी 65 लाख युनिट वीज निर्मिती झाली असून, त्यापैकी 4 कोटी 59 लाख 11 हजार 200 युनिट विजेची निर्यात करण्यात आली. त्यातून सुमारे 22 कोटी 90 लाख 96 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच सी-हेवी मळीपासून 20 लाख 33 हजार 841 लीटर रेक्टिफाइड स्पिरीटचे उत्पादन करून त्याची विक्री करण्यात आली.
गत हंगामात गाळपास आलेल्या 70 टक्के सभासदांची बिले अदा करण्यात आली आहेत. उर्वरित 30 टक्के, प्रामुख्याने डिसेंबर आणि जानेवारीतील ऊस उत्पादकांची बिले देणे बाकी आहेत. उपलब्ध निधीनुसार ही रक्कम लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सभासद व वाहतूकदारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे काडादी यांनी स्पष्ट केले.
सभेदरम्यान काही सभासदांनी ऊस बिलासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काडादी यांनी, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देणार नाही, असे सांगत दिवाळीपूर्वी सभासदांना व ऊस वाहतूकदारांना बिले देण्याचे जाहीर केले. निधीची उपलब्धता झाली तर लवकरच बिले अदा करण्याचे सभासदांना आश्वासित केले.
याप्रसंगी एकरी अधिक ऊस उत्पादन घेतलेले सुरेश लक्ष्मण जोशी (कामती खुर्द), विजया शिवदास चटके (शिवणी), दशरथ रेवणसिध्द माळी (होटगी), सिध्दप्पा भिमशा झुरळे (मुस्ती), गेनसिध्द धोंडप्पा गाडेकर (कर्देहळ्ळी), गुरूशांतप्पा नीलकंठ चिट्टे (कणबस), राजश्री प्रकाश गोटे (निंबर्गी) आणि रेवणसिध्द भीमराव माशाळे (कुसूर) यांचा सन्मानपत्र, शाल श्रीफळ तसेच अकरा गोणी कंपोस्ट खत घेऊन गौरव करण्यात आला.
या सभेला कारखान्याचे आजी-माजी संचालक, सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त, शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सिध्दराया बबलेश्वर यांनी केले.
…..चोैकट
काडादी यांचे भाषण
न ऐकल्याची हुरहुर
काही बिगर सभासद शेतकर्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घालून धर्मराज काडादी यांच्या भाषणात वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तर बहुतांश सभासद शेतकरी शांत बसून होते. काडादी काय बोलतात हे ऐकू, गोंधळ घालून पैसे मिळणार नाहीत, असे या सभासदांचे म्हणणे होते. काही सभासद शेतकर्यांनी गोंधळ घालणार्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, सभेमध्ये केवळ गोंधळ घालणे एवढाच काही बिगर सभासदांचा व बिगर ऊस उत्पादकांचा हेतू दिसत होता. त्यामुळे काडादी यांचे मनोगत ऐकण्यासाठी शांतपणे बसलेल्या व धोरणात्मक विषयावर चर्चा होईल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकर्यांनी खंत व्यक्त केली. सभा संपली तरी काडादी काही तरी बोलतील, या अपेक्षेने कारखान्यावर निष्ठा असलेले सभासद सभागृहात बसून होते. काडादी यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
Post Views: 12