सोलापूर : जागतिक रेबीज दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. श्वानदंशानंतर तातडीने उपचार व प्रतिबंधात्मक लसीकरण घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आणि आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रॅलीत शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमधील जीएनएम, एएनएम, आशा स्वयंसेविका आणि एमपीडब्ल्यू कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मदर तेरेसा नागरी आरोग्य केंद्रापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीपूर्वी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. सुहासिनी वाळवेकर यांची रेबीज प्रतिबंधाबाबत विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. उपस्थितांना ही मुलाखत ऐकविण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले आणि श्वान लसीकरण करणाऱ्या सिस्टर रेश्मा तलफदार यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.महापालिकेत रॅलीचे स्वागत आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केले. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन डॉ. सोहेल मणियार यांनी केले. रॅलीच्या मार्गावर सहभागी कर्मचाऱ्यांनी जनजागृतीपर फलक हातात घेत घोषणांद्वारे नागरिकांना श्वानदंशानंतर विलंब न करता वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन केले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा आणि अंधश्रद्धा व घरगुती उपचार टाळावेत, असा संदेश देण्यात आला.
रॅलीच्या आयोजनासाठी कोहिनूर इन्स्टिट्यूटचे मॅनेजर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 12