मंगळवेढा – मोठा गाजावाजा करून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केवळ ६ टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करत, दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पडत नसल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे फडणवीस सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांना सरसकट मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
भाळवणी येथे फडणवीस सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते.
कर्जमाफीचा लाभ फक्त ६ टक्के शेतकऱ्यांना
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफी योजना जाहीर केली; मात्र सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी मानसिकतेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची नसून उद्योगपतींना कर्जमाफी देण्याची आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सरसकट मदत, तात्काळ टँकर, १००% पीकविमा
यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. “दुष्काळ जाहीर केल्यानंतरही पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता कशासाठी? शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर सरसकट मदत जाहीर करा. पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव मागण्याऐवजी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तात्काळ टँकर मंजूर करा. पीक नुकसानीची १०० टक्के नोंद करून पीकविम्याची रक्कम मिळाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी
दुष्काळाच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने चारा छावण्यांपेक्षा चारा डेपो सुरू करण्याची गरज असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले. “चारा छावण्या सुरू केल्या तर गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना थेट चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘फसवा जीआर’ असल्याचा काँग्रेसचा आरोप
भाषणादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत “फडणवीस सरकारचा हा जीआर फसवा आहे,” अशी टीका केली.
शेतकऱ्यांच्या मागण्या
सरसकट कर्जमाफी द्या
दुष्काळ जाहीर केल्यानंतर तात्काळ टँकर मंजूर करा
१००% पीकविमा रक्कम द्या
चारा डेपो सुरू करा
पाण्याचा प्रश्न सोडवा
प्रशांत साळे यांची भूमिका
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी तालुक्यातील शेती, पाणी आणि शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने करण्यात आली असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रश्न शासन दरबारी मांडले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘कोरड्या दुष्काळाचा जीआरही कोरडाच!’
ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी सरकारच्या दुष्काळी निर्णयावर उपरोधिक टीका करत, “जलसंधारण आणि पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करा. शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा छावणीत नाही, तर दावणीत पाहिजे,” असे म्हटले.
यावेळी काँग्रेसचे राज्यसचिव ॲड. रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, विष्णू चोगुले, पांडुरंग चोगुले, सरपंच लक्ष्मण गायकवाड, मच्छिंद्र पाटील, किशोर भंडगे, रावसाहेब बेंडगे, विठ्ठल लोंढे, विठ्ठल लोंढे, निसार तांबोळी, शहाजान पटेल, नवनाथ ढगे, विनायक माळी, संदीप पवार, तानाजी आवळेकर, गंगादेव शिंदे, ज्ञानेश्वर सोडिकर, धनाजी चव्हाण, शिवाजी गाडेकर, यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत, सरसकट कर्जमाफी, पीकविम्याचा लाभ, पाण्याची पूर्तता आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
Post Views: 13