सोलापूर – हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १९ बालकांना मोफत उपचारासाठी मंगळवारी विशेष बसद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विशेष बसला हिरवा झेंडा दाखवून बालकांना मुंबईकडे रवाना केले.
मुंबईतील बालाजी रुग्णालयात या बालकांवर आवश्यक तपासणीनंतर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना पूर्वसूचना देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. मुंबईतील मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराबाबत पालकांचे समुपदेशनही करण्यात आले. प्रत्येक बालकासोबत दोन पालकांना पाठविण्यात आले असून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी बससोबत वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
बालक व त्यांच्या पालकांच्या मुंबई प्रवासासह निवास, नाश्ता आणि भोजनाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील उपचाराचा आर्थिक भार कमी होणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २,००३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, तर विविध आजारांसाठी ११,८६० शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. किरकोळ आजार असलेल्या बालकांना तपासणीच्या ठिकाणीच आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. इरफान सय्यद, मेट्रन विजयमाला बेले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोट
शस्त्रक्रिया यामुळे बालकांना निरोगी आयुष्याची संधी
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला आवश्यक उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. लवकर निदान, वेळेत उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया यामुळे बालकांना निरोगी आयुष्याची संधी मिळते. या १९ बालकांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 12