सोलापूर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वतःच्या सुखसोयींकडे दुर्लक्ष करून सातत्याने सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा उपक्रम सोलापुरात पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून संघर्ष प्रतिष्ठान आणि शिवविश्व सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शेळगी नागरी आरोग्य केंद्र व दहिटणे नागरी आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
आरोग्य सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी मानून कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल या कार्यक्रमातून घेण्यात आली. विशेषतः नागरिकांच्या आरोग्याशी थेट जोडलेल्या आशा सेविकांपासून ते वैद्यकीय व प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे सोलापूर शहराध्यक्ष डॉ. सचिन बोगरगी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, युवा उद्योजक सोमनाथ रगबले, डॉ. वर्धमान, डॉ. धाराशिवे, संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमेश कोळेकर, शिवविश्व सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष धरीराज रमणशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आरोग्य सेवेत कार्यरत प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमलता टोणपे, लक्ष्मीकला वंग्गा, वैभव शिंदे, सुनीता कांगणे, संतोष वाघमारे, सिंधू शिंदे, स्मिता पसारे, श्रीदेवी देसाई आणि शोभा गोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन उमेश कोळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन धरीराज रमणशेट्टी यांनी केले.
—
Post Views: 24