सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेला आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी १६ लाख ४८ हजार ५६० रुपयांचा आयकर परतावा मिळाला असून ही रक्कम महापालिकेच्या बँक खात्यात जमा झाली आहे. विशेष म्हणजे, आयकर विभागाने महापालिकेकडे केलेली १९ लाख ४६ हजार ३२० रुपयांची मागणी पूर्णपणे शून्य करण्यात यश आले आहे. महापालिकेचे कर सल्लागार अभिषेक विठ्ठल शिरसीकर यांच्या सातत्यपूर्ण कायदेशीर पाठपुराव्यामुळे ही कार्यवाही शक्य झाली.
महापालिकेचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा १५ लाख १५ हजार १५० रुपयांचा आयकर परतावा १८ मार्च २०२६ रोजी मंजूर झाला होता. त्यानंतर आयकर विभागाकडून महापालिकेला १९ लाख ४६ हजार ३२० रुपयांची मागणी नोटीस प्राप्त झाली. त्यामुळे हे प्रकरण महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे बनले होते.या नोटीसबाबत कर सल्लागारांमार्फत आयकर विभागाकडे तातडीने कायदेशीर खुलासा आणि दुरुस्ती अर्ज दाखल करण्यात आला. आवश्यक कागदपत्रे व वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडत आयकर विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर विभागाने महापालिकेची संपूर्ण १९ लाख ४६ हजार ३२० रुपयांची मागणी रद्द करून ती ‘निल’ केली. यासोबतच मूळ परताव्यावर १ लाख ३३ हजार ४१० रुपयांचे व्याज मंजूर झाले. त्यामुळे महापालिकेच्या खात्यात एकूण १६ लाख ४८ हजार ५६० रुपये जमा झाले.
या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि मुख्य लेखापाल अधिकारी रत्नराज जवळगीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आयकर अधिकारी संजय भारद्वाज आणि आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त ढेरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
११ वर्षांत १.९४ कोटींचा लाभ
आर्थिक वर्ष २०१३-१४ ते २०२४-२५ या ११ वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या विविध क्लिष्ट आयकर प्रकरणांमध्ये कर सल्लागारांच्या माध्यमातून प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत महापालिकेला १ कोटी ९४ लाख २० हजार ४९० रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळाला आहे. त्यामुळे आयकर विषयक प्रकरणांच्या प्रभावी कायदेशीर पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला मोठा आर्थिक हातभार लागला आहे.
—-
Post Views: 15