सोलापूर – पोषण आहारातील विविधता वाढविण्यासह दैनंदिन आहारात प्रथिनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पोषण अभियानाच्या माध्यमातून टी.एच.आर.
(टेक होम रेशन) साहित्यापासून प्रथिनयुक्त पाककृती तयार करण्याची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्ताने दि. ८ ऑक्टोबर पर्यंत जिल्हास्तरावर ही स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यातून एका उत्कृष्ट पाककृतीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
टी.एच.आर.च्या माध्यमातून मिळणाऱ्या पोषण साहित्याचा अधिक कल्पक आणि प्रभावी वापर व्हावा, तसेच त्यापासून विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळावे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. त्यामुळे अंगणवाडीतील लाभार्थी महिला आणि किशोरवयीन मुलींसह सेविका व मदतनीस यांना आपल्या पाककृती सादर करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धकांना तयार केलेल्या पाककृतीसोबत टी.एच.आर रेसिपीचे नाव, त्यात वाढविण्यात आलेले पदार्थ व त्यांचे प्रमाण, पाककृती तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि अंदाजे खर्च याची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय तयार पदार्थाचे प्रथिने, उष्मांक, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे अंदाजे पोषणमूल्य नमूद करणे आवश्यक राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्तम पाककृतीची निवड करण्यासाठी स्थानिक होम सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य, नामांकित आहारतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांचा समावेश असलेली समिती नियुक्त केली जाणार आहे. या समितीकडून जिल्ह्यातील एका सर्वोत्तम स्पर्धकाची निवड करून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारस करण्यात येणार आहे.
टी.एच.आर.च्या माध्यमातून मिळणाऱ्या पोषण आहाराचा अधिकाधिक आणि योग्य पद्धतीने वापर व्हावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. उपलब्ध साहित्यापासून स्थानिक पातळीवर सहज तयार करता येतील, अशा पौष्टिक व प्रथिनयुक्त पाककृती पुढे याव्यात, यासाठी स्पर्धकांनी नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. या उपक्रमातून पोषणाबाबत जनजागृती होण्यासोबतच लाभार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्यास मदत होईल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.
जिल्ह्यातून निवड झालेल्या स्पर्धकाची पाककृती राज्यस्तरीय स्पर्धेत सादर केली जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतून निवडलेले ३६ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची निवड करून विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकाची पाककृती, पोषणमूल्य, खर्च, तयारीचा कालावधी, छायाचित्र तसेच पाककृती तयार करतानाचा शॉर्ट व्हिडीओ आदी माहिती राज्य पोषण संसाधन कक्षाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.