बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या ‘उन्मेष–सृजनरंगाचा’ युवा महोत्सवात शाहीर अमर शेख लोककला मंचावर आयोजित कव्वाली गायन स्पर्धेत युवा कलावंतांनी आपल्या दमदार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. १० महाविद्यालयांच्या संघांनी ताल, ठेका, स्वरांची उठावदार मांडणी आणि सामूहिक गायनातून कव्वालीचा रंगमंचीय आविष्कार सादर केला.
कव्वाली हा भारतात रुजलेला भक्तिप्रधान संगीत प्रकार असून, तालबद्ध गायन, समूहाने धृपद किंवा मुखडा ठोसपणे सादर करणे आणि स्वरांमधील चढउतार ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. युवा महोत्सवाच्या माध्यमातून या पारंपरिक गायन प्रकाराला विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून नवी ऊर्जा दिली.
या स्पर्धेत युनियन एज्युकेशन सोसायटीचे महिला महाविद्यालय, सोलापूर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, सांगोला महाविद्यालय, सांगोला, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर, सोलापूर सोशल असोसिएशनचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर, डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर आणि एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव या १० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
गायनातील सूर, लय-ताल, समुहातील समन्वय, आवाजातील चढउतार आणि सादरीकरणातील रंगत यामुळे मंचावर उत्साही वातावरण निर्माण झाले. प्रत्येक संघाने आपल्या शैलीत कव्वाली सादर करताना गायनकौशल्य आणि सांघिक सादरीकरणाची ताकद दाखवून दिली.
Post Views: 24