सोलापूर : समाजजीवन अधिक सुसह्य, सुरक्षित आणि गतिमान करण्यामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या जीवनाचा अभियंता असून, आपण जसे वागतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची घडण होत असते. त्यामुळे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
शासकीय सेवेत कार्यरत राहून अभियंता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १८ अभियंत्यांना ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्तम अभियंता पुरस्कार-२०२६’ देऊन गौरविण्यात आले. शिवस्मारक सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शासकीय अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाला महावितरणचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. नसीमा पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या अभियंत्यांचा झाला सन्मान
डॉ. विशाल कांबळे , विजय रूपनर, शेख खालेद सलिम अब्दुल हकीम , महेश काळे , धीरज बड्डे, प्रदीप मोरे, हेमंत ताकपेरे , प्रा. प्रणोती डोके , नीलेश देशमुख , सुमित पिसे , प्रेमसागर कोरे , सागर खरे , सिद्धेश्वर भोसले , राजरत्न रणदिवे , अमर काळे , विश्वास शिंदे , सुजय वाघचवरे आणि चंद्रकांत जाधव यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पुरस्कारामुळे जबाबदारीची जाणीव वाढते : सोनटक्के
पुरस्कारामुळे जीवनात आनंद आणि चैतन्य निर्माण होते. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव वाढून भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी सांगितले. .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, तर आशुतोष नाटकर यांनी प्रास्ताविक केले.
Post Views: 11