मोहोळ – शेटफळ येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करित या घटनेतील फरार असलेल्या उर्वरित सर्व २१ आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका सारखी कलमे लावून कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी प्रशासनाला आणि राज्य सरकारला दिला आहे.
शेटफळ येथे पाहणी करून पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केदार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ८० वर्षांच्या वृद्ध मातेला घरात घुसून मारहाण केली गेली, लहान मुले थरथर कापत रडत होती, तसेच घराच्या दरवाजांवर दगड फेकून व सिमेंटचे बांबू घुसवून मोडतोड करण्यात आली, असे सांगत एवढे सगळे घडत असताना पोलीस काय बघत होते आणि त्यांनी मूकदर्शकाची भूमिका का घेतली, असा सवाल त्यांनी विचारला. दलित कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर त्यांच्यावर तात्काळ ‘मोका’ किंवा ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली जाते, मग घर पेटवायला निघालेल्या आणि तडीपार असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कलमे का लावली जात नाहीत, अशी विचारणा करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर केला. अशा प्रकारे आमची कोंडी केली जात असेल, तर दलित पॅंथर्स शांत बसणार नाही आणि या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही, असे ते म्हणाले. राजकीय वरदहस्त असल्याच्या बळावर कोणी जर मस्ती करत असेल, तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की याच पश्चिम महाराष्ट्रातून दलित पॅंथर्सचा जन्म झाला आहे, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि राजकीय दबावावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणी आमदार, खासदार असोत, ५ वर्षे येतात आणि जातात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि कायदा हाच सर्वोच्च आहे, हे पोलिसांनी विसरू नये. कडक कलमांन्वये कारवाई करावी, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्तांनी शेटफळ गावात स्वतः येऊन शांतता समितीची बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पीडित मातंग आणि बौद्ध समाजातील कुटुंबांना पूर्ण पोलीस संरक्षण व न्याय न मिळाल्यास हे आंदोलन केवळ शेटफळ किंवा मोहोळपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरवेल, असा सज्जड इशारा केदार यांनी आपल्या भाषणातून दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी शिवशरण, महिला जिल्हा संघटक वैशाली उबाळे, मोहोळ तालुकाध्यक्ष राजन सिरसट, महिला तालुकाध्यक्ष लता आखाडे, जितेश जगताप, संकेत जाधव, माधव भालेराव, निलेश खरात, नितीन सरोदे आदींसह शेटफळ गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

एवढा मोठा भ्याड हल्ला होऊनही सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे आणि राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी या पीडित कुटुंबांची भेट घेतली नाही. घटनेनंतरही दोन्ही खासदारांनी घटनास्थळी न येऊन दाखवलेल्या या उदासीनतेबद्दल श्री.केदार यांनी त्यांचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला.
Post Views: 6