अकलूज – साखरेला किमान ₹५० प्रति किलो आधारभूत किंमत (MSP) मिळावी, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि साखर कामगारांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस परिषद, पंढरपूर यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनासाठी अकलूजहून शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले.
महाराष्ट्रातील विविध भागांतून ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे सभासद तसेच कामगार दिल्ली येथील जंतर-मंतरवर २, ३, ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अकलूज येथूनही शेतकऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, अनेक बसमधून शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये साखरेला किमान ₹५० प्रति किलो MSP लागू करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे केंद्र सरकारने लक्ष देणे, तसेच सहकारी साखर कारखाने आणि साखर उद्योगाशी संबंधित कामगारांच्या अस्तित्व व भवितव्याबाबत ठोस निर्णय घेणे, या मागण्यांचा समावेश आहे.
साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या शेतकरी, कामगार आणि सहकारी संस्थांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. ‘शेतकरी वाचला तर शेती वाचेल, शेती वाचली तर सहकार वाचेल आणि सहकार वाचला तर कामगार वाचेल’, असा संदेश देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अकलूजहून दिल्लीकडे रवाना झालेल्या शेतकऱ्यांमुळे परिसरात ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे
दीपक भोसले,
सुहास पाटील,
सचिन पाटील,
अजित बोरकर,
भानुदास सालगुडे पाटील या
आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
Post Views: 14