सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दोन सहाय्यक आयुक्तांच्या खातेवाटपात फेरबदल केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६९ मधील तरतुदीनुसार सुधारित विभाग वाटप आदेश जारी करण्यात आला आहे.
या फेरबदलानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखालील विभागांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे. भूमी व मालमत्ता विभागासह हुतात्मा स्मृती मंदिराची जबाबदारी आता सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी हा विभाग सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली होता.
दरम्यान, निवडणूक कार्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आता सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे. यापूर्वी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे या कार्यालयाचे नियंत्रण होते.
महापालिका आयुक्तांच्या सर्वसाधारण नियंत्रणाखाली तसेच पुनर्विलोकनाच्या अटींना अधीन राहून हे सुधारित खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटपातील या बदलाव्यतिरिक्त अन्य बाबींशी संबंधित यापूर्वीचे आदेश पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासकीय कामकाजातील जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप करून विभागांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न या फेरबदलातून करण्यात आला आहे.
Post Views: 27