मंगळवेढ – दुष्काळात जनावरे जगण्यासाठी चाऱ्याचा प्राधान्याने विचार करता चारा डेपो किंवा चारा छावणीऐवजी छावणीतील जनावरांना दिल्या जाणाऱ्या अनुदान इतकी रक्कम महाडिबीटी (महा पोर्टल) द्वारे शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर द्यावी, अशी मागणी लेडवे चिंचाळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांच्याकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा
जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांनी आज गणेशवाडी, आंधळगाव, लेडवे चिंचाळे आणि शिरसी या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. त्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी ही मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, परमेश्वर आवताडे, देवा इंगोले आदींसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांनी मांडली वस्तुस्थिती
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. असता शेतकऱ्यांना पेरणी कधी झाली याबाबतची विचारणा केली. असता शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे काही हाताला लागले नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे येत्या काही दिवसात रब्बीचा पाऊस पडेल या आशेवर त्या पिकाची फणपाळी करून ठेवली. त्यामुळे पंचनामे करताना आम्ही काय दाखवायचे? वस्तुस्थिती बघून पंचनामे करावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
सरसकट पंचनाम्याच्या सूचना
यावर जिल्हाधिकारी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या टँकरची माहिती घेत मागणीप्रमाणे आवश्यक ते टँकरच्या खेपा सुरू करण्याच्या सूचना देखील दिल्या. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पंचनामे थेट बांधावर जिओ-टॅगिंगसह ८ दिवसांत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.
चारा छावणीऐवजी थेट अनुदानाची मागणी
पशुपालकांनी जनावरांचा चाऱ्याचा विचार करून जर छावणी सुरू केली, तर छावणीतील शेडनेटमध्ये गोट्यातील जनावरे तग धरत नाहीत. शेडनेटमधून ५०% ऊन येत असल्यामुळे ही जनावरे दगावण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या छावण्यात अशी जनावरे दगावलेली आहेत. त्यामुळे चार किंवा पाच गावाचा विचार करून चारा डेपो सुरू केला, तर तिथून चारा आणणे पशुपालकाला अडचणीचे आणि जास्त वेळ खाऊ होणार आहे.
त्यामुळे तसे न करता छावणीचालकाला प्रति जनावर जे अनुदान देते, त्यापेक्षा दहा रुपये कमी द्या, पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आपले मत सरकारला कळवून, त्यावर सरकार जे काही निर्णय घेईल, त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका शेतकऱ्याशी संवाद साधताना मांडली. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) द्वारे थेट खात्यात पैसे पाठवण्याची घोषणा केली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती
राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांमध्ये पंचनामे सुरू आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
टँकर व्यवस्थेचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर व्यवस्थेचा आढावा घेतला. मंगळवेढा तालुक्यात १६ गावांत १८ टँकर सुरू आहेत. माढा तालुक्यात १३ गावांत १३ टँकर सुरू आहेत. राज्यात सध्या ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Post Views: 22