वैराग – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात, आनंदात आणि शांततामय वातावरणात पार पडला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी शांतता समिती व गणेश मंडळांच्या बैठका घेऊन “No DJ, No Dolby, No Laser Light” या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यातील १२ उत्कृष्ट गणेश मंडळांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने ‘जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मानचिन्ह (ट्रॉफी) व प्रशस्तीपत्र देऊन या मंडळांचा गौरव करण्यात आला.
विविध सामाजिक उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारंपरिक मिरवणुकीवरील अवाजवी खर्च व प्रदूषण टाळून गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृतीपर कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे स्तुत्य उपक्रम राबवले. या उपक्रमांचा संपूर्ण आढावा घेऊन प्रत्येक उपविभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका गणेश मंडळाची ‘गणराया अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली.
सन्मानित झालेली १२ गणेश मंडळे व अध्यक्ष:
१. आदर्श गणेश उत्सव मंडळ, मोहोळ – अध्यक्ष: संकेत मुंडासे
२. शिवप्रेमी तरुण मंडळ, बी. बी. दारफळ – अध्यक्ष: महेश साठे
३. लोकमान्य गणेश मंडळ, अक्कलकोट – अध्यक्ष:मिलन कल्याणशेट्टी
४. श्री जगदंबा गणेश उत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळ, कसबा पेठ, माढा – अध्यक्ष: महेश भांगे
५. आझाद गणेश मंडळ, बार्शी – अध्यक्ष: सुरज वरीदे
६. कोष्टी गल्ली गणेश मित्र मंडळ, टेंभुर्णी – अध्यक्ष: श्री. वैभव शंतनू वाधावकर
७. शनिराज गणेश मित्र मंडळ, कुर्डूवाडी – अध्यक्ष: प्रतीक शेंबडे
८. लोकप्रिय भैय्यू देशीय गणेश तरुण मंडळ, महिम (ता. सांगोला) – अध्यक्ष: गणेश गोरवे
९. जय भवानी गणेश उत्सव मंडळ, नंदेश्वर (ता. मंगळवेढा) – अध्यक्ष: वीराज रूपनर
१०. वक्रतुंड गणेश उत्सव तरुण मंडळ, ईसाबावी (पंढरपूर) – अध्यक्ष: नितीन लाड
११. आझाद तरुण मंडळ (आझादचा राजा), नातेपुते – अध्यक्ष: सिद्धार्थ जमदाडे
१२. छावा ग्रुप गणेश मंडळ, नेवरे (ता. माळशिरस) – अध्यक्ष: शेखर बोबडे
“उत्सवातून समाजसेवा अन् भक्तीतून पर्यावरण संवर्धन”
या पारितोषिक वितरण सोहळ्यास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, तसेच माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, तसेच पंढरपूर, सांगोला, नातेपुते, माळशिरस, टेंभुर्णी, अक्कलकोट,तालुका पोलीस ठाणे सोलापूर, मोहोळ या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांचे कौतुक केले आणि “भविष्यातही गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळून, पर्यावरणाचे रक्षण करत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा,” असे आवाहन केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या या अनोख्या उपक्रमामुळे जिल्ह्यात “उत्सवातून समाजसेवा आणि भक्तीतून पर्यावरण संवर्धन” हा एक अत्यंत सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
Post Views: 20