सोलापूर – सोलापूर शहरातील पार्क चौक येथील नेहरू वसतिगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. ऑडिटची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शासकीय तंत्रनिकेतनने असमर्थता दर्शविल्यानंतर वालचंद कॉलेजनेही नकार दिला आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथील स्वेरी कॉलेजकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. वारंवार संस्थांकडून असमर्थता व्यक्त होत असल्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबतचा तांत्रिक अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. पंढरपूरची विठूमाऊली तर पावणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
नेहरू वसतिगृहाच्या इमारतीची सद्यस्थिती, बांधकामाची मजबुती, संभाव्य धोके आणि आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीची गरज निश्चित करण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट महत्त्वाचे आहे. मात्र, ऑडिटची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संस्थांकडून असमर्थता व्यक्त होत असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतनकडे ऑडिटची जबाबदारी सोपविली होती. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शविल्याने वालचंद कॉलेजकडे पाठपुरावा करण्यात आला. तेथूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता स्वेरी कॉलेजचा पर्याय पुढे आला आहे.
स्वेरी कॉलेजकडून ऑडिटची प्रक्रिया कधी पूर्ण होते आणि त्यातून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत काय निष्कर्ष समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
चौकट
इमारतीच्या सुरक्षिततेबाबत स्पष्टता आवश्यक
वसतिगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरच तिची सद्यस्थिती आणि दुरुस्तीची आवश्यकता याबाबत ठोस निर्णय घेता येणार आहे. इमारत वापरण्यास सुरक्षित आहे का, कोणत्या दुरुस्त्या आवश्यक आहेत आणि पुनर्बांधणीची गरज आहे का, याचे तांत्रिक मूल्यमापन अहवालातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऑडिटची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार म्हणाले, “इमारतीची सद्यस्थिती, बांधकामाची मजबुती, संभाव्य धोके तसेच आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीबाबत स्पष्टता मिळावी, यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार म्हणाले.
कोट
पंढरपूर येथील स्वेरी कॉलेजकडून ऑडिट करून घेण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार आता या कॉलेजकडून ऑडिट करून घेण्यात येईल. असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सांगितले
Post Views: 36