बार्शी – मागील साडेनऊ वर्षांपासून बार्शीकरांच्या नशिबी आलेली पाणीटंचाई, १५ ते १८ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आणि त्यातही दूषित पाण्याचा सामना करणाऱ्या नागरिकांचा संताप आंदोलनस्थळी उतरला. बार्शी नगरपरिषदेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि महिलांनी तिरंगा झेंड्याखाली एकत्र येत तहसील कार्यालयाजवळ लाक्षणिक उपोषण केले. ‘आम्हाला प्यायला पाणी दिले नाही, तर आमच्यातले पाणी दाखवून तुमची खुर्ची हालवू,’ असा आक्रमक इशारा कॉ. तानाजी ठोंबरे यांनी प्रशासनाला दिला.
१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या आंदोलनात २९६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करावी, राष्ट्रीय महामार्गाची परवानगी मिळवून प्रलंबित पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करावे, टँकरची संख्या वाढवून जीपीएस यंत्रणा बसवावी, जलवाहिनीची गळती शोधण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरावी, प्रत्येक प्रभागाचे पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर करावे आणि जलदाय विभागातील रिक्त पदे भरावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.
कॉ. ठोंबरे म्हणाले, पाणी प्रश्नावर १० ऑगस्ट रोजी मोर्चा काढल्यानंतरही दोन महिन्यांत प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवू नयेत. पाणीप्रश्न सोडविण्याची क्षमता नसेल, तर खुर्ची सोडावी. नागरिकांना पाणी मिळत नसताना पाणीपट्टी कशासाठी, असा सवाल करत यंदाची पाणीपट्टी माफ करण्याची मागणीही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पाणीप्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला. तहसील एफ. आर. शेख यांनी भेट दिल्यानंतर संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून समाधानकारक तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महिलांचा संताप अनावर!
भवानी पेठेतील प्रिया कानडे, प्रमिला झोंबाडे, शहनाज शेख यांच्यासह नगरसेविका चांगुणा जाधव, सायरा मुल्ला, विद्या बंगाळे, गोदावरी शिंदे, रागिणी पाचपुते यांनी व्यथा मांडल्या. दूषित पाणी, अनियमित पुरवठा आणि पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती यामुळे कुटुंबांचे आरोग्य, रोजगार आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘जितके दिवस पाणी, तितकीच पाणीपट्टी घ्या,’ अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, गणेश जाधव, कृष्णराज बारबोले, राहुल कोंढारे, वाहिद शेख, शंकर देवकर, मनीष देशपांडे, वसीम पठाण,अजित कांबळे, नितीन भोसले यांच्यासह २१ नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला,नागरिक उपस्थित होते.
चौकट :
मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांची असंवेदनशीलता व अरेरावी
उपोषणस्थळी आलेले मुख्याधिकारी तैमूर मुलाणी व उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी गडबड करुन पाटोळे यांनी हातवारे व अरेरावी करत असंवेदनशीलता दाखवली. महिलांनी पाणीटंचाईच्या समस्या मांडल्या, मात्र अधिकाऱ्यांच्या वर्णनावरुन काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
चौकट —
‘आमचा ब्रँड उजनी ब्रँड!’
आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील आठवड्यात उपोषण सोडवायला कोणता ‘ब्रँड’ आणायचा? असा प्रश्न विचारल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी ‘आमचा ब्रँड उजनी ब्रँड’ अशी घोषणा दिवसभर दिल्या. बार्शीची जुनी उजनी पाणीपुरवठा योजना आमदार दिलीप सोपल व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने १९९१ मध्ये मंजूर होऊन १९९५ मध्ये कार्यान्वित झाली होती. या योजनेच्या मान्यवरांच्या योगदानाचा उल्लेख करत “आमचा ब्रँड उजनी ब्रँड” च्या घोषणा दिल्या.