तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बुधवारी (दि. १४) नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देशभरातून भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत असल्याने मंदिर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
बुधवारी देवीची नित्योपचार पूजा विधिवत संपन्न झाली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. आई तुळजाभवानीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेने भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात येत आहेत. नवरात्रोत्सवामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी (दि. १३) रात्री श्री तुळजाभवानी देवीची वाघ वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीत मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी आणि भाविक सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, महंत तुकोजीबुवा आणि महंत वाकोजीबुवा यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तुळजापुरात भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक परंपरांचा संगम पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी वाढणारी भाविकांची गर्दी आणि विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.




















