पंढरपूर – मागील गळीत हंगामाच्या वेळी जाहीर केल्याप्रमाणे जिल्हृयात उच्चांकी ऊस दर ३ हजार१५० रुपये दिला असून त्यामधील ३ हजार ५० रुपये देण्यात आलेले आहेत.उर्वरीत १०० रुपयांचा हप्ता येत्या दिवाळीपुर्वी देण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे याही गळीत हंगामामध्ये जिल्हयात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार असून, सर्व सभासदांना सवलतीच्या दरातील साखर वाटप लवकरच सुरु करुन सहकार शिरोमणी कारखान्याच्या सर्व सभासदांची दिपावली गोड करण्यात येणार असल्याचेही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील वाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखाना लि, सहयोगी ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या २७ वा बॉयलर अग्नीप्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभा प्रसंगी बोत्रे-पाटील बोलत होते. सोशल मिडीयावर पसरविण्यात येत असलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार ग्रुपवर विश्वास ठेवुन आपला संपुर्ण ऊस गळीतास देण्याचे आवाहनही यावेळी केले.
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि. युनिट नं.१ ते २७ चे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, मुख्य् कार्यकारी अधिकारी तेजस्वीनी बर्गे व इतर मान्यवरांच्या हस्ते २७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन व मोळी पुजन करण्यात आले. यावेळी श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी (स्व.) वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कारखाना आर्थिक अडचणीत असताना संस्था टिकुन रहावी, सर्व सभासद, कामगार या सर्वाचे हित डोळ्यासमोर ठेवुन, आपल्या सर्वांच्या सहमतीने ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा चेअरमन श्री.बोत्रे-पाटील यांचे सहकार्याने सहयोगी तत्वावर हा कारखाना चालविण्याचे ठरविले आहे. अद्याप सहयोग कराराची कागदोपत्री पुर्तता नसतानाही आपल्या कारखान्यास कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे मागील गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला असून, चालू गळीत हंगाम आपणा सर्वाचे सहकार्याने यशस्वी करण्यासाठी आम्ही कटीबध्द् आहोत.
सध्या दुष्काळ परस्थिती असल्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना क्षमतेप्रमाणे गाळप करणे कठीण जाणार असून, पाण्या अभावी पिके करपू लागली आहेत. त्याकरीता पाण्याचे योग्य नियोजन व पाण्याचे मागणी फार्म भरुन देणे गरजेचे आहे. सिझनमध्ये ऊसाची स्पर्धा वाढणार आहे मात्र आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी हे (स्व.)वसंतदादांनी अथक परिश्रमातुन भाळवणीच्या माळराणावर उभारणी केलेल्या आपल्या हक्काच्या कारखान्यास ऊस कमी पडू देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि ओंकार ग्रुपचे सहयोगाने यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देवुन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे यांनी केले. यावेळी उस्थितांचे स्वागत प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संचालक युवराज दगडे यांनी मानले.सुत्र संचलन गणेश वाघमळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे नुतन व्हा.चेअरमन मोहननागटिळक, माजी व्हा.चेअरमन भारत कोळेकर आदींसह सर्व आजीमाजी संचालक, शेतकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 16