पंढरपूर – राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चंद्रभागा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा केवळ १५ ते २० दिवस पुरेल इतकाच असल्याने पंढरपूर नगरपालिकेने १६ ऑक्टोबरपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बुधवारी (दि.१४) परिपत्रक जारी केले आहे.
राज्य शासनाने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना १० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार पंढरपूर नगरपालिकेनेही पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल केला आहे. पाणी पुरवठ्याच्या नवीन नियोजनानुसार, रेल्वे रुळाखालील भागात १६ ऑक्टोबरपासून, तर रेल्वे रुळाच्या वरील भागातील उपनगरांमध्ये १७ ऑक्टोबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
———————
चौकट : ( पाण्याचा अपव्यय केल्यास कडक कारवाईचा इशारा)
दरम्यान पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी तसेच सडा टाकण्यासाठी पाण्याचा वापर करू नये, असे निर्देशही नगरपालिकेने दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे. शहरातील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 14