सोलापूर – शालेय विद्यार्थ्यांना केवळ पोटभर जेवण नव्हे, तर सकस आणि संतुलित आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहाराच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. पोषण आहारातील तांदळाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, सोया यांसारख्या पौष्टिक धान्यांचा समावेश करण्याचा विचार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा प्रथिनयुक्त पदार्थ देण्याचेही नियोजन असून, त्यामुळे शालेय मुलांच्या आरोग्याला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या बदलामुळे पारंपरिक तांदळावर आधारित पोषण आहाराला अधिक वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक स्वरूप मिळू शकते. पनीर, टोफू, केळी किंवा पौष्टिक मिलेट बार यांपैकी एका पदार्थाचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या बदलांची अंतिम अंमलबजावणी शासनाच्या निर्णयानंतरच होणार आहे.
दरम्यान, अंगणवाडी स्तरावरील पोषण आहाराच्या दरांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे बालकांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोषणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
चौकट
तांदळाऐवजी स्थानिक भरडधान्यांना प्राधान्य
सध्या शालेय पोषण आहारात भात, खिचडी, वरण आणि गोड शिरा यांसारख्या पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो. नव्या नियोजनानुसार आहारात भरडधान्यांचा वापर वाढवून विद्यार्थ्यांना अधिक पोषक घटक उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारख्या धान्यांमधून आहारातील विविधता वाढविण्यास मदत होईल.
चौकट
सोलापूर जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या सुमारे ४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमित शालेय पोषण आहार दिला जातो. नव्या बदलांची अंमलबजावणी झाल्यास या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात अधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
कोट
जिल्हास्तरावर ठरणार अंमलबजावणीचे नियोजन
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शासनस्तरावर पुढील निर्णय घेतले जातील. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर आहाराचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.
Post Views: 33