सासवड, / अकलूज – अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे होणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या आणि कऱ्हा नदीच्या काठावर वसलेल्या खानवडी येथे दरवर्षी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन यांसह विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे संघटक व मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिद्धिप्रमुख अमोल भोसले, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या सहकार्याने भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचे नियोजन आहे. या संमेलनात राज्य व देशपातळीवरील मान्यवर साहित्यिक, कवी आणि विचारवंत सहभागी होणार आहेत.
या संमेलनात दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने लेखक, कवी आणि कलावंत सहभागी होतात. यंदाच्या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक व कवींनी मोबाईल क्रमांक ९८८१०९८४८१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी केले आहे.
Post Views: 19