बार्शी – खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने रुपये ५,००० अग्रीम मदत वाटपाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या मदत वाटपासाठी शासनाने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, याद्या तयार करणे व लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा प्रत्येक तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्यभरातील तहसील स्तरावर ही प्रक्रिया सुरु असताना बार्शी तालुक्याने या कामात आघाडी घेतली आहे. प्रायोगिक तत्त्वावर बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी गावात प्रायोगिक तत्त्वावर दहा खातेदारांना मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली असून, या माध्यमातून राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरला आहे. त्यामुळे खरीप दुष्काळ २०२६ च्या अग्रीम मदत वाटप प्रक्रियेत बार्शी तालुक्याने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली अचूकपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच प्रत्येक गावाचे नियंत्रण अधिकारी आणि ग्रामस्तरीय पंचनामा समितीमधील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, पोर्टलवर याद्या तयार करणे, माहितीची पडताळणी करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करुन काम वेळेत पूर्ण करणे, यासाठी महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
दिवाळीपूर्वी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत अग्रीम मदतीचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, त्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरु आहे. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी यासाठी बार्शी महसूल प्रशासन कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 15