सोलापूर : दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. याच सणाचे औचित्य साधून स्वराज संस्थेच्या वतीने ‘मायेची उब’ हा हिवाळी कपडे दान उपक्रम राबविण्यात आला. रविवारी सोलापूर शहरात या उपक्रमांतर्गत बेघर व गरजू व्यक्तींना हिवाळ्यात उपयोगी पडणाऱ्या उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.
हिवाळ्याच्या दिवसांत बेघर व गरजू व्यक्तींना थंडीपासून संरक्षण मिळावे आणि त्यांना उबदार कपड्यांचा आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संकलित केलेले कपडे गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून स्वयंसेवकांनाही विशेष आनंद झाला. दिवाळीच्या सणात केवळ स्वतःचा आनंद साजरा न करता समाजातील गरजू घटकांपर्यंत आपुलकी, प्रेम आणि माणुसकी पोहोचवण्याचा स्वराज संस्थेचा हा एक छोटासा प्रयत्न होता.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे, स्वयंसेवकांचे तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या दिवाळीत घरांसोबतच माणुसकीची नातीही उजळवण्याचा सुंदर संदेश ‘मायेची उब’ या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी संस्थापिका-अध्यक्षा स्वराली भोसले-गवळी, निरंजन कुलकर्णी, दीपा नारायणकर, देवेंद्र दंतकाळे, वैष्णवी धप्पाधुळे, आर्यराज भोसले, प्रथमेश ओहोळ, सोबिया इनामदार, ऋतुजा फंड, साक्षी मशाळकर, किरण बेळ्ळे आणि चैतन्य शेटे यांनी सहभाग घेतला.




















