बार्शी – बार्शी शहराला उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरील वॉशआउट व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे अंदाजे ४० ते ५० लाख लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून, नगरपरिषदेचे सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी बार्शी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अभियंता अंकिता एकबोटे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बार्शी शहराला उजनी धरणाच्या बॅकवॉटरमधील कंदर (ता. करमाळा) येथून सुमारे ७२ किलोमीटर अंतरावरील मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या संयुक्त योजनेतून बार्शी व कुडुवाडी नगरपरिषदांना पाणीपुरवठा होतो. मुख्य जलवाहिनीच्या गळती दुरुस्ती व नवीन जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन जोडण्याच्या कामासाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत पंपिंग बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंपिंग सुरू करण्यात आले होते. मात्र, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बार्शीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले नसल्याने पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने बार्शी ते कुडुवाडी दरम्यानच्या जलवाहिनीची तपासणी सुरू केली. एअर व्हॉल्व्ह आणि वॉशआउट व्हॉल्व्हची पाहणी करताना लक्षाचीवाडी गावच्या शिवारात बायपासलगत असलेला वॉशआउट व्हॉल्व्ह सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात होते. पाहणी केली असता व्हॉल्व्हचे स्पिडल सैल करून तो सुरू करण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्याने हा व्हॉल्व्ह सुरू केला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाण्यासोबतच बार्शी शहराचा नियोजित पाणीपुरवठाही विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय झाली. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
Post Views: 11