सोलापूर – ऊस गाळप सुरू झाले, लाखो टन उसाचे गाळपही झाले. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा दर अद्याप जाहीर नाही. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधत कारखानदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या उसाचा दर ठरवण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत कारखानदारांनी आजच दर जाहीर करावा, अशी ठाम भूमिका शेट्टी यांनी मांडली.
जिल्ह्यातील दोन ते तीन साखर कारखान्यांनी एक ते दोन लाख टनांपर्यंत उसाचे गाळप केले असल्याचा मुद्दा शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाळप होऊनही ऊस दराबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारखानदारांकडून दर जाहीर करण्याबाबत होत असलेली टाळाटाळ म्हणजे शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधल्याने या प्रश्नाला पुन्हा एकदा धार आली आहे. आता उद्याच्या बैठकीत ऊस दराबाबत ठोस निर्णय होणार का, प्रशासन कारखानदारांना दर जाहीर करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगणार का आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
दर जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांचा ठिय्या कायम!
जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या फोनवरील संवादात राजू शेट्टी यांनी ऊस दराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. उद्या होणाऱ्या बैठकीपर्यंत परिस्थिती कायम ठेवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, प्रश्न सुटेपर्यंत ते आंदोलनाच्या भूमिकेवर कायम राहतील, असा इशाराही त्यांच्या भूमिकेतून देण्यात आला.
चौकट
उद्याच्या बैठकीत काय तोडगा निघणार?
ऊस दराचा प्रश्न केवळ कारखानदार आणि शेतकरी यांच्यातील व्यवहारापुरता मर्यादित नसून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होतो. ऊस उत्पादनासाठी केलेला खर्च, मजुरी, खते, पाणी आणि वाहतूक यांचा हिशेब पाहता उसाला योग्य दर मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे गाळप सुरू असताना दराबाबत अनिश्चितता कायम राहिल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते.
Post Views: 40