सोलापूर – उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती दीपक वैद्य यांनी दिले. प्रत्येक गावातील नाल्यांची माहिती संकलित करून जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार करावा. त्याचबरोबर जल जीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण होऊनही किरकोळ त्रुटींमुळे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू नसल्यास अशा प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणीपुरवठा, जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी केवळ योजनांची कामे पूर्ण झाल्याची नोंद न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळतो आहे का, याची खातरजमा करण्यावर अध्यक्ष वैद्य यांनी भर दिला.
गावागावांतील जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्यासाठी नाल्यांचे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी जलसंधारण विभागाच्या उपअभियंत्यांनी प्रत्येक गावातील नाल्यांची सविस्तर माहिती संकलित करावी. हा तपशील संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक कामांचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरच्या (MRSAC) ‘स्मार्ट व्हिलेज पोर्टल’चा वापर करून गावनिहाय जलस्रोतांची माहिती उपलब्ध करून घेण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिले. यामुळे जलसंधारणाच्या कामांसाठी योग्य ठिकाणांची निवड करणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
दरम्यान, पाणीटंचाईच्या काळात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सिंचन व्यवस्थाही सक्षम ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महावितरणचे विद्युत रोहित्र (डीपी) नादुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना वैद्य यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समिती सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, गीतांजली साळुंखे, शनमुखी कोरके, रश्मी हिप्परगी, वंदना कांबळे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयेश हेडगिरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख उपस्थित होते.
चौकट
योजनांच्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष पाण्याला प्राधान्य
जल जीवन मिशनच्या अपूर्ण त्रुटी दूर करणे, गावनिहाय जलस्रोतांचा नकाशा तयार करणे आणि सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवणे या तीन महत्त्वाच्या बाबींवर बैठकीत भर देण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत.
Views: 25