कुर्डुवाडी – राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे हे शासनाचे प्रमुख ध्येय असून यामध्ये कोणतीही कसूर किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवा देत असताना स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करू नये, अन्यथा स्वतःहून राजीनामा द्यावा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘आरोग्य संवाद यात्रा’ निमित्त गुरुवारी दुपारी ३ .०५ ते ६.३० या वेळेत माढा तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी आणि पिंपळनेर येथील शासकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
दौऱ्यातील ठळक मुद्दे:
उपळाई खुर्द येथे भोजन- सोलापूरकडून आल्यानंतर मंत्र्यांनी प्रथम उपळाई खुर्द येथे सचिन कदम यांच्या घरी भोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर माढा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
कुर्डुवाडी ट्रॉमा केअर युनिट एका महिन्यात सुरू होणार- सायंकाळी ५ वाजता कुर्डुवाडी येथील ट्रॉमा केअर युनिटला भेट दिली असता, येथील निकृष्ट इमारतीच्या कामाबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर बांधकाम हे दारिद्र्य रेषेखालील दिसते .नुसताच सांगाडा दिसत आहे असे म्हणत बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराला खडेबोल सुनावत त्यांनी फर्निचर व इतर सुविधांसाठी अतिरिक्त ५० लाखांच्या निधी देतो ते तरी चांगल्या दर्जाचे करा. तसेच, एका महिन्याच्या आत या युनिटमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मशिनरी उपलब्ध करून स्वतः उद्घाटनाला येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी मंजूर: सायंकाळी ६ वाजता पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता ग्रामस्थांनी नवीन इमारत, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकेची (ॲम्बुलन्स) मागणी केली. मंत्री आबिटकर यांनी या मागण्यांना तत्काळ मान्यता देत १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली व तातडीने आदेश दिले.
दौऱ्यात उपस्थित प्रमुख मान्यवर:
यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, प्रा. शिवाजी सावंत, शिंदेसेनेचे नेते संजय कोकाटे, कुर्डुवाडीच्या नगराध्यक्ष जयश्री भिसे, महेश साठे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड,आय एम ए ( महाराष्ट्र) चे अध्यक्ष डाॅ.संतोष कुलकर्णी, डॉ. सदानंद व्हनकळस यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
Views: 9