सोलापूर – वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आणि प्रत्यक्ष सेवा देण्यातील तत्परता यावरच शासकीय आरोग्य व्यवस्थेचा दर्जा ठरतो. माढा तालुक्यातील पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राने मर्यादित मनुष्यबळातही प्रभावी आरोग्यसेवा देत राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. खुद्द सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या केंद्राच्या कामकाजाचे कौतुक करत राज्यातील इतर आरोग्य केंद्रांनीही पिंपळनेरचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.
जनसंवाद आरोग्य यात्रेनिमित्त ५ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री आबिटकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, या केंद्रात केवळ एका बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असतानाही संबंधित अधिकारी केंद्रात मुक्कामी राहून रुग्णांना सेवा देत असल्याची बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आली. मर्यादित मनुष्यबळातही रुग्णसेवेला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी रुग्ण, लाभार्थी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत आरोग्य सेवांबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. प्रसूती सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा आणि इमारतीची पाहणी केली. इतर ठिकाणी आरोग्य सेवांबाबत तक्रारी ऐकायला मिळाल्या; मात्र पिंपळनेरमध्ये नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याने आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन प्रभावीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
दरम्यान, केंद्रात प्रसूती झालेल्या मातेला जन्म प्रमाणपत्र आणि बेबी किटचे वितरण करण्यात आले. अधिकाधिक संस्थात्मक प्रसूती, गर्भवतींच्या वेळेवर तपासण्या, रेबीज प्रतिबंधक लस व जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा, तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा सक्षम ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.
यावेळी आमदार अभिजित आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब ढाणे, सविता कोकाटे, वंदना कांबळे, सरपंच अनुजा डांगे, डॉ. विजय कंदेवाड, डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Views: 12