सोलापूर – दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव आणि ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अक्कलकोट शहरातील कोळी वस्ती गोल चौक येथे २०० गरजू शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजवंतांच्या घरात आनंदाचा दिवा पेटविण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेनिमित्त शिवपुरी येथील स्वामी शिवानंद योगेंद्र गोवंश केंद्रात गाय व वासराचे विधिवत पूजन करून गोवंशासाठी चारा वाटप करण्यात आले. त्यानंतर कोळी वस्ती गोल चौक येथे फराळ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक किसन जाधव यांनी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, अक्कलकोट नगरीचा विकास ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कामातून दिसणारी वस्तुस्थिती आहे. देशभरातून लाखो भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येतात. अशा पवित्र नगरीला सुंदर, विकसित आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी सचिनदादा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अक्कलकोटचा चेहरामोहरा बदलत असून, त्यांच्या विकासाभिमुख कार्याला मनापासून सलाम! त्यांनी आमदारपदावरून नामदारपदापर्यंत झेप घ्यावी, हीच आमची मनःपूर्वक सदिच्छा आहे. तसेच यावेळी किसन जाधव यांनी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं. त्यांच्या सूचनेनुसारच गरजवंतांची दिवाळी गोड करण्याचा हा उपक्रम राबविला आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड यांनीही संकटकाळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले याप्रसंगी युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, हिंदू धर्मरक्षक प्रथमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते रुद्रय्या स्वामी, राजू ब्रदर जाधव, सिकंदर शेख, उमेश जाधव, अमोल जगताप, फिरोज पठाण, हुलगप्पा शासम आदी उपस्थित होते.