नांदेड – अज्ञान, मोह, तृष्णा, अहंकार आणि द्वेष यासारख्या मानसिक विकारांपासून मुक्त होण्यासाठी धम्मविचारांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. मैत्री, बंधुभाव आणि संघभावनेच्या बळावर समताधिष्ठित समाजनिर्मिती शक्य आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षाही धम्मातून निर्माण होणारी नाती अधिक व्यापक आणि श्रेष्ठ असतात. त्यामुळे धम्माशी जोडलेली मैत्री जपत विश्वकुटुंबाची संकल्पना प्रत्यक्षात आणावी, असे प्रतिपादन धम्मचारी उपायराजा यांनी केले.
हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील उर्गेन भंते संघरक्षित ध्यान भावना केंद्रात त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड यांच्या वतीने ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान आयोजित पाच दिवसीय मुक्ती कोण पथे? धम्म अभ्यास शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी उपायराजा यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये मांडलेल्या मुक्ती कोण पथे? या विचारांचे आजही मोठे महत्त्व आहे. जातीयता आणि अन्यायकारक व्यवस्थेतून मुक्त होण्यासाठी केवळ बाह्य संघर्ष पुरेसा नाही, तर मनातील राग, लोभ, द्वेष आणि मोह या विकारांवरही विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यातूनच आत्मविश्वास आणि परिवर्तनाची खरी ताकद निर्माण होते. आधुनिक काळात इंटरनेटच्या अतिवापराच्या व्यसनापासूनही स्वतःला दूर ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात मिळालेले ध्यानसाधनेचे, अभ्यासाचे व सहजीवनाचे अनुभव केवळ पाच दिवसांपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात उतरवावेत. शिबिरात केलेले संकल्प स्मरणात ठेवून नव्या ऊर्जेने जीवनाची वाटचाल करावी. येथून परतताना मैत्रीचे बळ, बंधुभावाचे नाते आणि संघभावना सोबत घेऊन जावी, असे आवाहनही धम्मचारी उपायराजा यांनी केले.
या पाच दिवसीय शिबिरात दररोज मुख्य प्रवचन, दहा गटांमध्ये गटचर्चा, संपर्क सराव, ध्यानसाधना, गाथा पठण आणि रात्रीचे प्रवचन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. महिला, पुरुष आणि बालकांसह एकूण १५० शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. समारोपप्रसंगी काही शिबिरार्थींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गीत सादरीकरण, मूकनाटिका आणि एकपात्री प्रयोग अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. शेवटी मैत्रीगीताने शिबिराची सांगता झाली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी धम्मचारी चंद्रगर्भ, मैत्रेयकेतू, अभयध्वज, धम्मचारिणी दानदीपा, धम्मचारिणी रत्नलोचना, धम्मचारी मंगलबोधी, विद्याघोष, वज्रघोष, विनयरक्षित, बोधिश्रद्धा, अभयसेन तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे चेअरमन धम्मचारी पद्मगर्भ यांनी सहकार्य केले.






















