नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर तसेच भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत भोकर तालुक्यातील रावणगाव येथील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय कदम, काँग्रेसचेच गंगाधरराव कदम, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रविकांत कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव गिरीश कदम यांचा समावेश आहे. याप्रसंगी आमदार श्रीजया चव्हाण, भाजप नांदेड महानगर अध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, वरिष्ठ नेते जगदीश पाटील भोसीकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, जिल्हा बँकेचे संचालक रामचंद्र मुसळे, किशोर पाटील लगळूदकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. खा. अशोकराव चव्हाण यांनी पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजप परिवारात स्वागत केले. या सर्व कार्यकर्त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क आगामी काळात पक्षसंघटना तळागाळापर्यंत अधिक बळकट करण्यासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






















