माहूर : वय अवघे १७ वर्षे… मधुमेहासारख्या आजाराशी रोजचा संघर्ष… त्यात उपचारांचा आर्थिक भार! अशा कठीण परिस्थितीत एका कुटुंबाच्या मदतीला प्रफुल्ल प्रकाश राठोड धावून आले. त्यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे रोशनच्या नियमित औषधोपचाराची व्यवस्था झाली असून, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
किनवट तालुक्यातील ठाकूरवाडी रायपूर तांडा येथील रोशन प्रल्हाद चव्हाण हा १७ वर्षीय मुलगा मधुमेहाने त्रस्त आहे. त्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी इन्सुलिन घ्यावे लागते. आयुष्यभर उपचारांची गरज असलेल्या या आजारामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडत आहे. वडील प्रल्हाद चव्हाण शेती व शेतीपूरक व्यवसाय सांभाळत मुलाच्या उपचारांसाठी जिद्दीने आर्थिक जुळवाजुळव करीत आहेत. मात्र मर्यादित उत्पन्नामुळे त्यांचा संघर्ष अधिकच कठीण बनला आहे.
ही परिस्थिती लक्षात येताच बळीराम पाटील मिशन, मांडवीचे अध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश राठोड यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके यांच्याशी संपर्क साधून रोशनच्या नियमित उपचारांसाठी मांडवी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण सहायता निधीतून औषधांची व्यवस्था करून दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पवार उपस्थित होते.
प्रफुल्ल प्रकाश राठोड हे बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच उत्तम राठोड अध्यापक विद्यालय, श्रीक्षेत्र माहूरचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेल्या या मदतीचे मांडवीसह माहूर परिसरात कौतुक होत आहे.
प्रफुल्ल राठोड यांच्या या सामाजिक बांधिलकीतून समाजातील सक्षम आणि दानशूर व्यक्तींनीही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने दातृत्वाची भावना जपत संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात दिल्यास अनेकांचे जीवनमान सुसह्य होऊ शकते. कारण माणुसकीचे खरे वैभव संपत्तीत नसून, ती इतरांच्या उपयोगी पडण्यात आहे!




















