अक्कलकोट : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ओंकार शुगर समूहाने गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊसबिलांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट ५, तडवळ आणि ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट १५, रुद्देवाडी या दोन्ही कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, कारखान्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट ५, तडवळ कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन १०० रुपये जमा केले आहेत. यापूर्वी अदा केलेल्या रकमेसह या कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ चा एकूण ऊसदर प्रतिटन ३,००० रुपये झाला आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या दरानुसार रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने समूहाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट १५, रुद्देवाडीनेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे. फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत कारखान्यास गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपये, तर १ मार्च २०२६ पासून गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता अदा करण्यात आला आहे. त्यानुसार युनिट १५ रुद्देवाडी कारखान्याचा एकूण ऊसदर फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ३,००० रुपये, तर १ मार्चनंतर गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ३,१०० रुपये झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याला प्राधान्य
साखर उद्योगात ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आणि ऊसबिलांची रक्कम वेळेत अदा होणे या बाबींना ओंकार शुगर समूहाने महत्त्व दिले आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने समूहाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. युनिट ५ तडवळ आणि युनिट १५ रुद्देवाडी या दोन्ही कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ऊसदराच्या बाबतीत पारदर्शकता राखत शेतकऱ्यांना देय रकमेची पूर्तता करण्याचा समूहाचा प्रयत्न या माध्यमातून अधोरेखित झाला आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली समूहाने साखर उद्योगाच्या विस्तारासोबतच शेतकरी, कामगार, तोडणी-वाहतूक ठेकेदार आणि संबंधित घटकांच्या हिताचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार्य हीच समूहाच्या प्रगतीची खरी ताकद असून, आगामी काळातही शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून कामकाज करण्याचा समूहाचा मानस आहे.
ओंकार शुगर समूहाच्या युनिट ५ तडवळ व युनिट १५ रुद्देवाडी या दोन्ही कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्याचे वितरण झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समूहाच्या शेतकरीकेंद्रित कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.