करकंब : शेतीच्या बांधावरचे कष्ट,ग्रामीण स्त्रीच्या मनातील भावविश्व,मातीशी जोडलेली नाळ आणि जगण्यातील अनुभवांचे वास्तव… अशा विविध विषयांना कवितांच्या माध्यमातून वाचा फोडत भोसे येथे दिवाळीनिमित्त आयोजित कवी संमेलनाने ग्रामस्थांना साहित्याच्या वेगळ्याच विश्वात नेले.केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहिलेली ही काव्यमैफल ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब दाखवणारी ठरली.कै.राजूबापू पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या निमंत्रित कवी संमेलनात छत्रपती संभाजीनगरच्या कवयित्री गुंजन पाटील,पंढरपूरचे कवी सूर्याजी भोसले,सांगोल्याचे कवी सुनील जवंजाळ,शिवाजीराव बंडगर आणि भोसेचे कवी संभाजी अडगळे यांनी आपल्या रचनांतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कवी शिवाजीराव बंडगर यांनी आपल्या रांगड्या ग्रामीण शैलीतून शेतकरी आणि शेतीव्यवस्थेतील वास्तव मांडत ग्रामीण जगण्यातील संघर्ष अधोरेखित केला. कवयित्री गुंजन पाटील यांनी ‘मी शेतकऱ्याची पोर’ आणि ‘डोरले’ या कवितांमधून शेतकरी कुटुंबातील स्त्रीचे भावविश्व, नात्यांमधील ओलावा आणि ग्रामीण संस्कृतीतील संवेदनशील पैलू प्रभावीपणे उलगडले. त्यांच्या कवितांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.कवी सूर्याजी भोसले यांनी ‘पायताण’ आणि ‘पुस्तक’ या कवितांतून अनुभव, जीवनमूल्ये आणि वास्तवाचे वेगळे दर्शन घडवले. तर सुनील जवंजाळ यांनी आपल्या मिश्किल आणि हजरजबाबी शैलीतील सूत्रसंचालनाने काव्यसंमेलनात रंगत आणली.गुलाबी थंडीच्या वातावरणात रंगलेल्या या साहित्यिक सोहळ्याला सरपंच गणेश पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कल्याणराव शिंदे,अशोक माळी, सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय तळेकर, कृष्णात माळी, आप्पासाहेब टरले,आण्णासो कोरके, बाळू अवघडे, संतोष काकडे, सुभाष जमदाडे,सारंग कुलकर्णी,तुकाराम कुंभार,संतोष कोरके,डॉ.युवराज श्रीखंडे,दीपक कोरके कोंडीबा कोरके यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कवी सुनील जवंजाळ आणि समाधान खारे यांनी केले.