बार्शी – बार्शी शहराच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा असलेल्या रस्ते, गटारी, पाणी आणि दिवाबत्तीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे. तसेच शहर व तालुक्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये संकेश्वर उद्यान, अण्णासाहेब बारबोले शॉपिंग सेंटर ते एकविराई मंदिर चौक या मार्गावर १ कोटी १ लाख ३५ हजार ७२६ रुपये खर्चुन नव्याने करण्यात येणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आ. राऊत म्हणाले की, प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मोठे मताधिक्य दिले आहे. या विश्वासाची मला जाणीव असून, या भागाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. बार्शी शहर व तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गाताचीवाडी येथील मंजूर एमआयडीसीसह वैराग आणि जामगाव परिसरात आणखी दोन एमआयडीसी मंजूर करण्यासाठी प्रयत्न व प्रस्तावित कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, नगरसेवक दीपक राऊत, नगरसेविका फरजाना जलसे, नगरसेवक प्रकाश माने, संदेश काकडे, आण्णासाहेब वाणी, माजी नगरसेवक नाना गाढवे, अबूभाई शेख, कुदळे
यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
Views: 12