हदगाव – क्रांतिवीर, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचा गौरव करताना जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे राणे यांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकताना सुनील राणे म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता. त्यांच्या जमिनी बळकावणे, जंगलावरील पारंपरिक हक्क हिरावून घेणे आणि जमीनदार-वतनदारांच्या माध्यमातून शोषण करणे असे प्रकार सुरू होते. या अन्यायाविरोधात भगवान बिरसा मुंडा यांनी अगदी बालवयातच संघर्षाची भूमिका स्वीकारली.
कार्यक्रमादरम्यान जयंतीचे आयोजक डॉ. दीपक नाईक यांनी आदिवासीबहुल गावांच्या विकासासंदर्भातील विविध मागण्या सुनील राणे यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये गावासाठी तलाव निर्मिती, पाणीप्रश्न सोडविणे आणि एक कोटी रुपये खर्चाच्या सभागृहाची उभारणी या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करताना राणे यांनी तलाव निर्मितीसाठी उपलब्ध शासकीय जमीन, जागेची आवश्यकता आणि योजनेची प्रक्रिया याबाबत माहिती घेतली. मोठ्या तलावासाठी केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
तसेच गावासाठी तातडीने लहान तलावाची आवश्यकता असल्यास संबंधित जागेची माहिती आणि आवश्यक तपशील उपलब्ध करून द्यावेत. एक-दोन किंवा तीन-चार गावांना उपयोगी पडणारा लहान तलाव उभारण्यासाठी स्वतःच्या खर्चातून मदत करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
एक कोटी रुपयांच्या सभागृहाच्या मागणीसंदर्भात संबंधितांशी चर्चा करून आयोजक डॉ. दीपक नाईक आणि संबंधित यंत्रणांची बैठक घडवून आणण्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विकासाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सुनील राणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला मराठवाडा संयोजक नितीन काळे, जिल्हा प्रभारी किरण पाटील, भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, अल्पसंख्याक प्रदेश कार्यकारणी सदस्य जी. एस. गौस, कु. शांभवी साले, रामचंद्र मुसळे, सौ. मांगराणी ताई अंबुलगेकर, रामराव भालेराव, सुधाकर कदम, सचिन कल्याणकर, जयंतीचे आयोजक डॉ. दीपक नाईक,पश्चिम हदगाव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत हाणवते यांच्यासह भाजपातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते, आदिवासी बांधव, ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





















