अक्कलकोट – बादोला बु. (ता. अक्कलकोट) : येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला गावकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा गटार बांधकामाचीच अधिक घाई असल्याचे चित्र बादोला बु. येथे पाहायला मिळत आहे. गावकरी पाण्यासाठी तडफडत असताना ग्रामपंचायत प्रशासन नेमके कोणत्या विकासकामाला प्राधान्य देत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्था कडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली असताना दुसरीकडे गटार बांधकामाची कामे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गावात विकासकामे होणे आवश्यकच आहे; मात्र नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक असलेले पिण्याचे पाणीच उपलब्ध नसेल, तर अशा विकासकामांचा सामान्य जनतेला काय उपयोग? असा सवाल सुज्ञ ग्रामस्था मधुन उपस्थित केला जात आहे.
पाण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ, घरगुती कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी आणि महिलांवर पडणारा अतिरिक्त ताण याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पाणीटंचाईच्या काळात तातडीने पर्यायी व्यवस्था करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ बांधकामांवर भर दिला जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गावकऱ्यांना गटार नको असे नाही, पण आधी पिण्याचे पाणी द्या! तहानलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी बांधकामात व्यस्त असलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल बादोला बु. येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन गावकऱ्यांची तहान भागवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Views: 12