सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या ई-बस सेवेमध्ये वाहक (कंडक्टर) पदावर महिलांना ५० टक्के प्राधान्य देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने महापालिकेने इलेक्ट्रिक ई-बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होत असताना या व्यवस्थेत महिलांनाही रोजगाराची संधी मिळणे आवश्यक आहे.महिला आज विविध क्षेत्रांत सक्षमपणे जबाबदारी पार पाडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही त्या प्रभावीपणे काम करू शकतात. त्यामुळे ई-बस सेवेतील वाहक पदांच्या एकूण नियुक्त्यांपैकी ५० टक्के पदांवर महिलांना प्राधान्य द्यावे. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळेल.
महिलांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन नियुक्ती प्रक्रियेत महिला उमेदवारांना ५० टक्के प्राधान्य देण्याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी उपमहापौर देवकर यांनी केली आहे.
Views: 14