जेऊर – उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटरसह अन्य प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी तसेच या प्रकल्पांचे समर्थन करणारे नेते आणि अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी चिखलठाण (ता.करमाळा) येथील कोटलिंग मंदिर परिसरात प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शेतकरी आणि मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रस्तावित प्रकल्प तातडीने रद्द न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
उजनी धरणातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर, तरंगता विद्युत प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन यासह अन्य प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकल्पांमुळे धरणग्रस्त शेतकरी, मच्छीमार आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांच्या संसारावर संकट आणणाऱ्या या प्रकल्पांचे समर्थन करणाऱ्या संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी नियमित दशक्रिया विधीप्रमाणे प्रतीकात्मक विधी पार पाडत आपला रोष व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मकाई कारखान्याचे संचालक दिनकर सरडे यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची भूमिका आणि त्यामागील कारणे स्पष्ट केली. पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने, सौरभ आरकिले, अनिता खरात, शिवाजीराव बंडगर, स्वप्निल मोरे आणि कृष्णा ताटे यांनी या प्रकल्पांमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे लक्ष वेधत प्रकल्पांना विरोध दर्शविला.
जितेंद्र भावे यांनी धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी आणि घरांचा त्याग केला, त्या धरणग्रस्तांचाच उजनीवरील प्रकल्पांमध्ये सर्वप्रथम हक्क असायला हवा, असे मत व्यक्त केले. मात्र, त्यांचे हक्क डावलून त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशिष्ट वर्गाच्या फायद्यासाठी हे प्रकल्प राबविले जात असल्याचा आरोप करत या लढ्यात आंदोलकांसोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्या सरडे, गुटाळ मावशी आणि वयाची नव्वदी पार केलेले ज्येष्ठ आंदोलक गणपत सरडे यांच्या भावना व्यक्त होताच उपस्थित वातावरण भावुक झाले. बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, नंदकिशोर वलटे, दत्तात्रय सरडे, चंद्रकांत सरडे, महेंद्र पाटील आणि दशरथ कांबळे यांनी या प्रश्नावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले.
जेऊरचे सरपंच तथा आमदार नारायण पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनी उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नावर आम्ही स्थानिक जनतेसोबत असून प्रकल्पविरोधी प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहोत. वेळ पडल्यास या लढ्यासाठी आमदारकी पणाला लावण्याचीही आमची तयारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य वनमाला सरडे, सरपंच धनश्री गलांडे, विकास गलांडे, दिनकर सरडे, धुळाभाऊ कोकरे, उदयसिंह देशमुख, राजेंद्र धांडे, दादासाहेब लबडे, भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे, अविनाश सरडे, योगेश सरडे, युन्नस सय्यद यांच्यासह करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Views: 10