पंढरपूर – कार्तिकी यात्रा २०२६ च्या अनुषंगाने पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत शहरासह चंद्रभागा नदीपात्र, वाळवंट, ६५ एकर भक्तिसागर आणि पत्राशेड परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, प्रकाशव्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
स्वच्छता व्यवस्थेसाठी १ हजार ५० कर्मचारी नियुक्त
यात्रा कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे ३५० कायमस्वरूपी व ७०० ठेक्यावरील असे एकूण १ हजार ५० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दररोज निर्माण होणाऱ्या १२० ते १५० टन कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्यासाठी ४१ घंटागाड्या, ६ कचरा वाहने, टिपर व ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यंत्रणा दोन सत्रांत कार्यरत राहणार आहे. सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सक्शन व्हॅक्युम मशिन्स, जेटिंग मशिन्स व कल्चर फवारणी यंत्रणाही उपलब्ध करण्यात आली आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी शहरात सुलभ शौचालयांची २ हजार ६२ आसने, नगरपरिषदेची ८४ आसने, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १३६ आसने आणि रेल्वे विभागाची १५ आसने उपलब्ध आहेत. याशिवाय ७० सार्वजनिक मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे. ६५ एकर परिसरात १ हजार ३८० कायमस्वरूपी शौचालये असून नदीपात्र, पत्राशेड व ६५ एकर परिसरात तात्पुरती प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उभारण्यात आली आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी २४ तास व्यवस्था
६५ एकर परिसरातील १५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पिण्याचे व वापराचे पाणी उपलब्ध होण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी पाण्याचे टँकर राखीव ठेवण्यात येणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र केंद्रे
यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा तत्काळ सामना करण्यासाठी ६५ एकर, चंद्रभागा नदीपात्र वाळवंट, पत्राशेड, तुकाराम भवन आणि नगरपरिषद कार्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे (EOC) स्थापन करण्यात आली आहेत.
अग्निशमन व्यवस्थेसाठी नगरपरिषदेची तीन अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सोलापूर महानगरपालिका तसेच बार्शी, करमाळा, मंगळवेढा, कुर्डुवाडी व सांगोला नगरपरिषदांची अग्निशमन वाहनेही उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. चंद्रभागा नदीपात्रात यांत्रिकी रबर बोटींसह प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
प्रकाशव्यवस्था व अतिक्रमण निर्मूलनावर विशेष लक्ष
यात्रा कालावधीत शहरातील पथदिवे सुरळीत सुरू राहावेत, यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गर्दीच्या प्रमुख ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांमधील अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण निर्मूलन, चंद्रभागा वाळवंट व ६५ एकर परिसरातील स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत.
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी भाविक व नागरिकांनी स्वच्छता राखून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. असेही मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी सांगितले.
Views: 13