सांगोला – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत समुपदेशन प्रक्रियेद्वारे ६७ शिक्षकांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्राथमिक शिक्षण अधिकारी विशाल मुळे व तालुका गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता वाढवून अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. अशा परिस्थितीत ६७ शिक्षकांच्या नियुक्तीमुळे शाळांमधील अध्यापन प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासही या नियुक्त्या उपयुक्त ठरणार आहेत.
चौकट-
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, ही जिल्हा परिषदेची प्राथमिकता आहे. नवनियुक्त शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षकांच्या योगदानातून सक्षम पिढी निर्माण होते आणि सक्षम पिढीतून समाज व राष्ट्राची प्रगती साध्य होते.
-सभापती चेतनसिंह केदार-सावंत
Views: 16