बार्शी – गायनाचे कौशल्य अंगी असूनही योग्य व्यासपीठाअभावी दुर्लक्षित राहिलेल्या नवोदित कलाकारांना संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने गॅलेक्सी ग्रुपच्यावतीने आयोजित ‘सुरों की यात्रा’ या कार्यक्रमाने बार्शीकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात रंगलेल्या या संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गॅलेक्सीचे संचालक गुरुदत्त कुलकर्णी आणि सुनील फल्ले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयकुमार शितोळे, विजयश्री पाटील, अशोक डहाळे, गुरुदत्त कुलकर्णी आणि सुनील फल्ले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. बार्शीकरांनी अशीच साथ दिल्यास यापेक्षाही भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करु, अशी भावना संयोजक गुरुदत्त कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
बार्शी ही विविध कलागुणांनी समृद्ध असलेल्या रत्नांची खाण आहे, हे या कार्यक्रमातून दिसून आले. अशा उपक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळते. भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले यांनी दिले. जयकुमार शितोळे आणि विजयश्री पाटील यांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले.
या संगीत मैफलीत भक्तिगीतांपासून ते लावणीपर्यंत विविध प्रकारची सुमारे ४० गाणी सादर करण्यात आली. तब्बल पाच ते सहा तास रंगलेल्या या कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि गायन कौशल्याने रसिकांची मने जिंकली. प्रत्येक गीताला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांनाही आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात गुरुदत्त कुलकर्णी, राहुल शेटे, परल शेटे, पांडुरंग जोशी, सुनील फल्ले, सुहास हलकुडे सर, नितीनकुमार जोशी, शशिकांत पटणे, साहेबराव ताटे, सुरेंद्र जंगम, शुभदा जंगम, दिनेश भुमकर, किरण बासुतकर, रामचंद्र मस्के, नागनाथ सोनवणे, मेजर अविनाश हिंगमिरे, सुजाता हिंगमिरे, शोभाताई रणशूर, मंगेश गुर्जल, गोविंद बचुटे, वंदना देवणे, वैशाली तांबिले, गणेश राऊत, छाया चव्हाण आणि जयश्री कदम या कलाकारांनी विविध गीते सादर केली.
पुण्याच्या नामवंत गायिका सत्वशीला कांदे यांनी द्वंद्वगीतांसाठी गायकांना सुरेल साथ दिली. धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका सौ. शितल कुलकर्णी यांनी प्रभावी सूत्रसंचालन करुन कार्यक्रमात रंगत आणली.
चहा विक्रेते तापडिया टी सेंटर यांच्या सहकार्याने संयोजक सुनील फल्ले यांनी प्रत्येक कलाकार आणि उपस्थित पाहुण्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमासाठी वसुंधरा ऑइल, श्री सत्य साईबाबा ट्रस्ट आणि शिवराज नागरी पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.
Views: 18